येस न्युज नेटवर्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्वर ओकच्या आवारात घुसखोरी करत आंदोलन केले. एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. आंदोलकांनी थेट शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे.
बुधवारी हायकोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर निकाल देताना सर्व कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रूजू होण्याचे आदेश दिले होते. तर, सरकारने कोणत्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्याचे आदेश दिले. एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीदेखील आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली होती. एसटी कर्मचारी पुन्हा कामावर परतील असे म्हटले जात असताना आज अचानकपणे एसटी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या आवारात आक्रमक आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी निवासस्थान परिसरात घुसले.