सोलापूर : शिक्षणाधिकारी किरण लोहार २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. लोहार तसेच अन्य एका कर्मचाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आलं असून ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले गुरुजी यांच्यावर आरोप केल्यांतर शिक्षणाधिकारी किरण लोहार चर्चेत आले होते.
कोल्हापूरमधील सुद्धा किरण लोहार यांची कारकिर्द अत्यंत वादग्रस्त ठरली होती. किरण लोहार यांच्या कोल्हापूरमधील बंगल्यावर कोल्हापूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने झाडाझडती केली आहे. विभागाने काल रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 3 पर्यंत कागदपत्रांची तपासणी केली. यावेळी किरण लोहार यांच्या बंगल्यात रोख रक्कम आढळून आली नाही. दरम्यान, तपासणी केल्यानंतर किरण लोहारच्या स्थावर मालमत्तेचा अहवाल आज सोलापूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे सुपूर्द केला जाणार आहे.
किरण लोहार यांची 13 महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेत बदली झाली होती. यापूर्वी त्यांनी रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत काम केलं आहे. तथापि, कोल्हापूर जिल्हा परिषदेत त्यांची शैली अत्यंत वादग्रस्त ठरली होती. जिल्हा परिषदेच्या सभागृहातच किरण लोहार यांच्यावर पैसे घेतल्याचे आरोप सदस्यांनी केला होता. त्यामुळे लोहार यांना कार्यमुक्त करण्याचा ठरावही कोल्हापूर जिल्हा परिषदेने केला.