सोलापूर : सोलापुरातील एका व्यक्तीने कार खरेदी करण्यासाठी खासगी बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, काही कारणास्तव कर्जदाराला कर्जाचे हप्ते वेळेवर भरता आले नाही. हप्ते वेळेवर न भरल्यामुळे संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांनी कर्जदाराच्या मुलाचे अपहरण केले. सोलापुरात एका खाजगी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांची ही मुजोरी दिसून आली. या कर्मचाऱ्यांनी कर्जदाराच्या मुलाचे अपहरण करत त्याला एका गोडाऊनमध्ये डांबून ठेवले होते.
मुलाच्या सुटकेसाठी खंडणीही मागितली : याप्रकरणी, कर्ज वसुलीसाठी अपहरण करणाऱ्या शकील बोंडे, इमरान शेख, देवा जाधव या वसुली कर्मचाऱ्यांविरोधात जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, कर्जदाराच्या मुलाचे अपहरण केलेच, मात्र त्यानंतरही मुलाला सोडण्यासाठी 10 हजार रुपयांची खंडणी मागितली असल्याचे समोर आले.
पोलिस आयुक्तांचा इशारा : चुकीच्या पद्धतीने जबरदस्तीने वसुली करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा सोलापूरचे पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिला आहे. बँक किंवा फायनान्स कंपनींचे एजंट सक्तीची किंवा गुंडगिरी पद्धतीने वसुली करत असतील तर कर्जदार किंवा नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असेही आवाहन विजय कबाडे यांनी सोलापूरच्या नागरिकांना केले आहे.