येस न्युज मराठी नेटवर्क । पश्चिम बंगालमध्ये राज्यमंत्र्यांवर बॉम्बहल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यमंत्री झाकीर हुसेन यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे डझनभर कार्यकर्ते हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मुर्शीदाबाद जिल्ह्यातील निमतिया रेल्वे स्टेशनवर हा हल्ला करण्यात आला. अज्ञातांनी झाकीर हुसेन आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दिशेने बॉम्ब फेकले.
हल्ल्यात झाकीर हुसेन यांच्या पायाला मोठी जखम झाली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी यासंबंधी कोणतीही माहिती दिली नव्हती. टीएमसीच्या मुर्शीदाबादमधील जिल्हाध्यक्ष अबु ताहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसेन यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि लवकरच त्यांना कोलकात्याला शिफ्ट केलं जाणार आहे.