नाशिक : शिर्डी येथील साईबाबा मंदिर प्रशासनाचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. गेल्या सहा महिन्यांत दोनवेळा विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्याने शिर्डी साईबाबा संस्थान मंडळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तसंच, येत्या दोन महिन्यांत नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्यात यावे अशी सूचनाही औरंगाबाद खंडपीठाने केल्या आहेत.
सहा महिन्यापूर्वीच शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळ नेमण्यात आले होते. मात्र, संस्थानच्या जाहीरनाम्यानुसार हे विश्वस्त मंडळ नसल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे उत्तमराव शेळके यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. नियमबाह्य मंडळ स्थापन केल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता. त्यामुळे हे मंडळ बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. याप्रकरणी गेल्या चार महिन्यांपासून खंडपीठात सुनावणी सुरू होती. अखेर, याबाबत आज निर्णज जाहीर झाला असून विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे.