मुंबई : सध्या राज्यात वाढीव वीज बिलांवरून राजकारण चांगलंचा तापल्याचं दिसत आहे. राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारने यू-टर्न घेतला आहे. त्यानंतर विरोधकांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. अशातच भाजपकडून आज राज्यभरात वाढीव वीज बिलांविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज भाजप वीज बिलांची होळी करणार आहे.
वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर आक्रमक होत भाजप राज्य सरकारला शॉक देण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. आज 23 नोव्हेंबर रोजी भाजप वीज बिल होळी आंदोलन करणार आहे. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.