मुंबई: कोरोनाचे नियम न जुमानता राज्यभरात मोठ्या गर्दीत राजकीय यात्रा आणि सभांना परवानगी आहे, हॉटेल्स मॉल सुरु झाली, मात्र मंदिरात जाण्यासाठीच भाविकांना का रोखले जाते. फक्त मंदिर खुली केल्यानेच कोरोना वाढतो, का असा सवाल करत भारतीय जनता पक्षाने आज राज्यभरात आंदोलन केले
. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात हे राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. नाशिक, नागपूर, पंढरपूर, पुणे आणि औरंगाबाद, शिर्दी परिसरातील विविध स्थानिक भाजप नेत्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध मंदिर परिसरात घंटानाद आणि शंखनाद करत भाजपने मंदिर उघडण्याची मागणी केली.
नाशकात रामकुंड परिसारत निदर्शन
महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांचे केंद्रस्थान मानल्या जाणाऱ्या नाशिकमध्येही ही निदर्शनं झाली. भाजप अध्यात्मिक आघाडीच्या वतीने रामकुंड परिसरात आंदोलन करण्यात आलं. यावेळी साधू महंत आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. नाशिकमध्ये आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आल. यावेळी महापौरांचीही उपस्थिती होती. सरकारला टल्ली झालेले लोक चालतात, मग देवाच्या भक्तीत तल्लीन झालेले लोक चालत नाही, असा सवाल नाशिकमधील साधू-महंतांनी केला.
पुण्यात कसबा गणपती मंदिरात आंदोलन
पुण्यातील भाजप आघाडीच्या वतीनंही भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या आवाजात घोषणाबाजी करत आंदोलन केले. पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीच्या मंदिरात हे आंदोलन करण्यात आलं. हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की, अशी घोषणा देत आज जन्माष्टमीचा मुहूर्त साधत मंदिरं उघडण्यासाठी जोरदार मागणी केली. लोकभावनेचा आदर करत मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मंदिरं उघडावीत, अशी मागणी केली. चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी पुण्याच्या कसबा गणपतीसमोर आरती करून आंदोलनाची सांगता केली.
औरंगाबादेत गजानन मंदिर परिसरात निदर्शन
औरंगाादमध्येही शहर भाजप आघाडीच्या वतीनं शहरातील मध्यवर्ती भागातील गजानन मंदिर परिसरात शंखनाद आणि घंटानाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येत मंदिरं उघडण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. शिर्डीतील साईमंदिरासमोर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या नेतृत्वात शंखनाद आंदोलन करण्यात आलं.
पंढरपूरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर शंखनाद
पंढरपूरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर भाजपाचे आमदार समाधान अवताडे आणि जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शंखनाद आंदोलन करण्यात आलं. राज्यात दारू दुकाने, भाजीपाला, सार्वजनिक वाहतूक ,माॅल सरकारने सुरू केले आहे. पण मंदिरे सुरू करण्याबाबत सरकार निर्णय घेत नसल्याची खंत यावेळी नेत्यांनी व्यक्त केली.पंढरपूरात 17 मार्च पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनास बंद आहे. दोन मोठ्या आणि दोन लहान यात्रा रद्द झाल्याने प्रासादिक विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर परिणाम होत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आलेल्या भाविकावर इथली आर्थिक उलाढाल अवलंबून असते. मात्र सगळे आता ठप्प झाले आहे, अशी व्यथा आंदोलकांनी मांडली.
बीडमध्ये बेलेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडले
सरकारचे निर्बंध आता पाळणार नाहीत, बिअर बार हॉटेल मॉल सुरू केले मग मंदिर बंद का ? असा सवाल करत आज बीडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंदिर उघडण्यात यावी यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह श्री क्षेत्र बेलेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडून आत प्रवेश केला. तसेच आज पासून सरकारचे नियम पाळणार नाही आज पासूनभक्तांना दर्शनासाठी हे मंदिर खुले राहील असा निर्णय घेण्यात आला. उघडलेले मंदिर बंद करू देणार नाही असा पवित्रा ,भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेण्यात आलाय.