जिल्हा परिषद तसेच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहीही करा मात्र स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घ्या… या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अजेंड्याला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. गेल्याच आठवड्यात काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे माजी आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या दोन्ही सुपुत्रांनी तसेच शिवसेनेचे प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी भाजपमध्ये जाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या सर्वांना भाजप प्रवेशाचा मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला. त्यानुसार प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघात कामाला लागले. शक्ती प्रदर्शन करत लवकरच हे प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघात भाजपमध्ये प्रवेश करणार होते. दिलीप माने यांनी दोनच दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भाजपसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. याच पार्श्वभूमीवर कालच आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या दोन सुपुत्रांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आणि आज दक्षिण सोलापूर मतदार संघातील सुभाष देशमुख समर्थकांनी माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजपप्रवेशा विरोधात आंदोलन केले. आ. सुभाष देशमुख यांनी उघडपणे भूमिका जाहीर करून कार्यकर्त्यांच्या भावना तिव्र असल्याचे सांगितले. भाजप विरोधात भूमिका स्पष्टपणे जाहीर केल्यामुळे एक प्रकारे मुख्यमंत्री तसेच भाजपच्या नेत्यांनाच चॅलेंज देण्याची ठिणगी सोलापुरात पडली आहे. याचे राज्यभर पडसाद उमटणार आहेत. त्यामुळे आता सुभाष देशमुख यांना भविष्यात जड होणाऱ्या माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश होणार की रखडणार याची उत्सुकता लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या गटाने सुरू केलेले सोलापूर जिल्ह्यातील फोडाफोडीचे राजकारण यशस्वी होणार की फेल होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे