मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने जवळपास अर्धा डझन विद्यमान खासदारांना तिकीट नाकारले. हा निर्णय भाजपाच्या अंगलट आला आणि अनेक ठिकाणी नव्या उमेदवारांचा पराभव झाला. भाजपाने २८ जागा लढविल्या आणि त्यांना केवळ नऊ ठिकाणी विजय मिळविता आला. यानंतर आता विधानसभा निवडणुकीत भाजपाने ताकही फुंकून प्यायची खबरदारी घेतल्याचे दिसते. त्यामुळेच पहिल्या यादीत ९९ उमेदवारांची घोषणा करत असताना भाजपाने ८० विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.
भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले, “गुजरात आणि हरियाणामध्ये भाजपाने जवळपास अर्धे आमदार वगळले होते. याप्रमाणे आता महाराष्ट्रात मात्र फार काही बदल करण्यात आलेले नाहीत. फक्त काही मतदारसंघांत जिथे विद्यमान आमदाराचा विजय होणे अवघड वाटत आहे, तिथेच नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.” नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने ४० आमदारांपैकी २३ आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली होती, तर १७ आमदारांचे तिकीट कापले होते.