उस्मानाबाद : देशात कोरोना व्हायरसचा धोका अजून संपलेला नसून कोरोनाची टांगती तलवार अद्यापही लोकांच्या मानगुटीवर आहे. अशातच देशातील चार राज्यांत बर्ड फ्लू ने धुमाकूळ घातलाय. चार राज्यांतील बर्ड फ्लूच्या कहरानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील पोल्ट्रीचालकांनी वेळीच उपाययोजना करायला तसंच काळजी घ्यायला सुरुवात केली आहे.
बर्ड फ्लू व इतर आजार कोंबड्यांच्या पिल्लांना होऊ नये यासाठी 7 व्या , 14 व 21 व्या दिवशी लस दिली जात आहे. तसेच स्वच्छ परिसर व पाणी दिले जात असल्याची माहिती रॉयल पोल्ट्री ट्रेंड़ीगचे मालक संतोष कोकाटे यांनी दिली. जिवंत कोंबडीचे दर प्रति किलो 98 रुपये होते ते आता 93 रुपये झाले असून पिल्लांचे दरही 8 रुपये कमी झाले आहेत. बाजारात बॉयलर चिकन 180 रुपये किलोने विकले जात असून विक्रीवर व किंमतीवर परीणाम झालेला नाही. कोरोना काळात कोंबडया विक्रीवर चांगलाच परिणाम झाला होता त्यानंतर आता बर्ड फ्लूचे संकट उभे राहिले असल्याने पोल्ट्री चालक धास्तावले आहेत.