भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने वयाच्या 25 व्या वर्षी आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. तिच्या निधनाने भोजपुरी मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. आकांक्षाने बनारस येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.
आकांक्षा बनारसमध्ये तिच्या आगामी प्रोजेक्टचं शूटिंग करत होती. शूटिंग संपल्यानंतर हॉटेलच्या रुममध्ये जाऊन गळफास घेत तिने आयुष्य संपवलं आहे. आकांक्षाने आत्महत्या का केली? हॉटेलमध्ये गेल्यावर अचानक काय झालं की आकांक्षाला टोकाचं पाऊल उचलावं लागलं? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत
वडिलांचं स्वप्न अपूर्णच
आकांक्षा दुबे हे भोजपुरी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय नाव आहे. अल्पावधीतच तिने खूप मोठा पल्ला गाठला. आकांक्षाला लहानपणापासूनच मॉडेलिंग, डान्स आणि अभिनयाची आवड होती. पण आपल्या लेकीने आयपीएस अधिकारी व्हावं, असं तिच्या वडिलांचं स्वप्न होतं.
आकांक्षा दुबेबद्दल जाणून घ्या…
टिकटॉक आणि इनस्टाग्रामच्या माध्यमातून आकांक्षाला चांगलीच लोकप्रियता मिळाली. टिकटॉकवर तिचे व्हिडीओ पोस्ट केल्या केल्या काही मिनिटांत व्हायरल व्हायचे. इन्स्टाग्रामवरदेखील तिचे 1.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. आकांक्षाने वयाच्या 17 व्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. भोजपुरी इंडस्ट्रीत काम करताना तिला अनेकदा नकाराचा सामना करावा लागला आहे. 2018 मध्ये एका मुलाखतीत ती म्हणाली होती की, नैराश्यामुळे मी सिनेसृष्टीत सोडत आहे”. पण आईने समजावल्यानंतर तिने पुन्हा कमबॅक केलं.
आकांक्षाने खोसारी लाल यादव आणि पवन सिंह यांच्यासह अनेक भोजपुरी सुपरस्टारसोबत काम केलं आहे. ‘वीरों के वीर’ आणि ‘कसम पैदा करने वाले की 2’ सारख्या सिनेमांतदेखील ती झळकली आहे. तसेच ‘नाच के मालकिनी’, ‘भुअरी’ आणि ‘काशी हिले पटना हिले’ सारख्या म्युझिक व्हिडीओमध्येदेखील तिने काम केलं आहे.
आकांक्षा दुबे काही दिवसांपूर्वी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. गेल्या काही दिवसांपासून ती समर सिंहला डेट करत होती. सोशल मीडियावर समरसोबतचा फोटो शेअर करत तिने त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली होती.