राजस्थान : मध्य प्रदेशनंतर आता भाजपने राजस्थानमध्ये दुसरा धमाका केला असून पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या वसुंधराराजे शिंदे यांना बाजूला करून भाजपने अनपेक्षितपणे भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते राजनाथ सिंह यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली.
भजनलाल शर्मा हे भरतपूरचे असून ते सांगानेर मतदारसंघातून निवडून आले आहेत. मतदारसंघाबाहेरचे असल्याचा आरोप असतानाही सांगानेरच्या जनतेने त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. भजनलाल शर्मा यांनी काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा 48,081 मतांनी पराभव केला. भजनलाल शर्मा हे संघ आणि भाजप संघटना या दोघांच्याही जवळचे मानले जातात.