येस न्युज मराठी नेटवर्क : पुणे आयकर विभागातील सहआयुक्त विठ्ठल भोसले यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या ‘फिरस्त्या’ या मराठी चित्रपटाचे अकरा देशांत कौतुक झाले आहे. जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने ५३ पुरस्कार पटकावले आहेत. चित्रपटाच्या निर्मात्या डॉ. स्वप्ना भोसले यांनी ही माहिती दिली. निराशेच्या गर्तेत अडकलेल्यांना आत्मविश्वास देणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शानाची सर्वांनाच उत्सुकता आहे. बार्शीचा उदयोन्मुख अभिनेता समीर परांजपे हा चित्रपटात मुख्य नायकाच्या भूमिकेत आहे.
विविध देशातील फेस्टिव्हलसाठी प्रवेशिका पाठवल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून २२ जूनपर्यंत हे पुरस्कार घोषित होत आहेत.अलीकडे कोलकता येथील व्हर्जिन स्प्रींग सीनी फेस्टमध्ये फिरस्त्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला असल्याचे भोसले म्हणाले.
सकारात्मकतेचे बीज पेरणारा ‘फिरस्त्या’ चित्रपट हा प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत यशापर्यंत पोहोचण्याची धडपड करणाऱ्या खेडेगावातील एका होतकरू मुलाची प्रेरणादायी गोष्ट आहे. प्रदर्शनापूर्वीच ‘फिरस्त्या’ने भारत, अमेरिका, रशिया, इंग्लंड, जपान, फ्रान्स, स्पेन, स्वीडन, सिंगापूर, चेक रिपब्लिक आणि रोमानिया या ११ देशांमधील २४ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकूण ५३ पुरस्कार जिंकले. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट- १८ पुरस्कार, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- १७ पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता- ७ पुरस्कार, सर्वाेत्कृष्ट पटकथा – ५ पुरस्कार, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण ३ पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पदार्पण- २ पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट संकलन १ असे पुरस्कार मिळालेले आहेत. ‘फिरस्त्या’ची फायनॅलिस्ट म्हणून अमेरिका, रशिया, स्वीडन आणि तुर्की या ४ देशांमधील ४ चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे.
भोसले यांनी चित्रपट लेखन आणि दिग्दर्शनाचे कोणतेही प्रशिक्षण न घेता केवळ इंटरनेटवर उपलब्ध माहिती आणि यु -ट्यूब वरील व्हिडिओ पाहून हा चित्रपट बनवला आहे. निर्माती डॉ.स्वप्ना विठ्ठल भोसले यांनी त्यांच्या ‘झुंजार मोशन पिक्चर्स’या संस्थेद्वारे ‘फिरस्त्या’ची निर्मिती केलेली आहे. चित्रपटाचे प्रमुख कलाकार समीर परांजपे, हरीश बारसकर, मयुरी कापडने आणि अंजली जोगळेकर आहेत. प्रमुख बाल कलाकार आज्ञेश मुडशिंगकर, श्रावणी अभंग व समर्थ जाधव आहेत. ‘फिरस्त्या‘ साठी पार्श्व गायन आदर्श शिंदे, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, संगीत दिग्दर्शन रोहित नागभिडे, देवदत्त मनीषा बाजी, पार्श्वसंगीत रोहित नागभिडे, गीतकार गुरू ठाकूर आणि वैभव देशमुख, छायाचित्रण गिरीश जांभळीकर, ध्वनी संयोजन राजेंद्र त्यागी यांनी केले आहे. संघर्षातून यशोशिखराकडे जाणाऱ्या नायकाची गोष्ट असलेला ‘फिरस्त्या’ पाहण्यासाठी आता मराठी रसिक श्रोतेही उत्सुक आहेत.