येस न्युज मराठी नेटवर्क : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चलनात असलेल्या नवीन नोटा छापणाऱ्या आणि त्या वापरात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी याप्रकरणात चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून ३५ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे या टोळीने घरातच बनावट नोटांचा छपाईखाना सुरू केला होता. पोलिसांनी प्रिंटरसह नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत केले आहे.दोघे बनावट नोटा विकण्यासाठी पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी येथे येणार असल्याचे समजले. पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी सापळा लावला. वर्णनानुसार संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी महेंद्र खंडास्कर आणि अब्दुल खान या दोघांना ताब्यात घेतले. झडतीमध्ये दोघांकडे २ लाख ८० हजारांच्या बनावट नोटा सापडल्या.चौकशीमध्ये त्यांचे आणखी दोन साथीदार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमीन शेख आणि फारूक चौधरी या दोघांना अटक करण्यात आली.