बालाजी अमाईन्स लिमिटेडला शाश्वत विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री कडून प्रतिष्ठित ‘सस्टेनेबिलिटी लीडर ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. FICCI ही भारतातील एक जुनी व नामांकित औद्योगिक संघटना असून तिची स्थापना १९२७ साली झाली आहे. भारतीय उद्योगांचे प्रतिनिधित्व करत ही संस्था सरकारसोबत समन्वय साधून आर्थिक विकास, व्यापार, गुंतवणूक आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
FICCI केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स अवॉर्ड्स २०२५ हा पुरस्कार सोहळा २२ जानेवारी २०२५ रोजी फेडरेशन हाऊस, नवी दिल्ली येथे पार पडला. ‘सस्टेनेबिलिटी लीडर ऑफ द इयर’ हा पुरस्कार बालाजी अमाईन्सला मिळाले असून, याच श्रेणीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि ट्रान्सपेक इंडस्ट्री लिमिटेड यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. मुख्य अतिथी श्रीमती अनुप्रिया पटेल, माननीय राज्यमंत्री, रसायन आणि खते तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या हस्ते बालाजी अमाईन्सच्या वतीने बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे संचालक जी. हेमंत रेड्डी यांनी पुरस्कार स्वीकारले. यावेळी सन्माननीय अतिथी रसायन आणि पेट्रोकेमिकल्स विभागाच्या सचिव श्रीमती निवेदिता शुक्ला वर्मा उपस्थित होत्या.
बालाजी अमाईन्स लिमिटेडची स्थापना १९८८ साली झाली असून कंपनीने सुरुवातीला धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी येथे एका प्रकल्पाद्वारे अलिफॅटिक अमाईन्स उत्पादनास सुरुवात केली होती. गेल्या तीन दशकांत कंपनीने अमाईन्स, डेरिव्हेटिव्हज आणि स्पेशालिटी केमिकल्स क्षेत्रात जागतिक स्तरावर विश्वासार्ह उत्पादक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. सध्या कंपनीचे महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात एकूण चार उत्पादन प्रकल्प कार्यरत असून ५० हून अधिक देशांमध्ये उत्पादनांची निर्यात केली जाते. भारतात प्रथमच काही उत्पादने विकसित करुन आयात पर्याय (Import Substitutes) म्हणून बाजारात आणण्याचा मानही कंपनीला मिळाला आहे. कंपनीकडे भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने मान्यता दिलेले इन-हाऊस R&D युनिट असून अनेक महत्त्वाची उत्पादने स्वतःच्या संशोधनातून विकसित करण्यात आली आहेत.
बालाजी अमाईन्सने पर्यावरण संवर्धनाला नेहमीच प्राधान्य दिले असून कंपनी Zero Liquid Discharge धोरण राबवते. उत्पादन प्रक्रियेत निर्माण होणारा वेस्टेज / कचरा कमी करणे, संसाधनांचा पुनर्वापर आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर यावर भर दिला जातो. कंपनी ९० टक्के सांडपाण्याचे शुद्धीकरण करून पुनर्वापर करते व केवळ १० टक्के ताज्या पाण्याचा वापर करते. आपल्या वीज गरजेचा मोठा भाग कंपनी स्वतःच्या सौर व पवन ऊर्जा प्रकल्पांतून पूर्ण केला जातो, ज्यामुळे कार्बन उत्सर्जनात मोठी घट झाली आहे. तसेच, हायड्रोजन वायूचा पुनर्वापर स्वच्छ इंधन म्हणून केला जातो व ७५ टक्के पुनर्वापरयोग्य पॅकेजिंग साहित्य वापरले जाते. यावेळी बोलताना व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी म्हणाले, “हा पुरस्कार म्हणजे स्वच्छ आणि हरित पर्यावरणासाठी आम्ही केलेल्या प्रयत्नांची पावती आहे. आमचे अध्यक्ष ए. प्रताप रेड्डी यांच्या दूरदृष्टीमुळेच आम्हाला अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीमध्ये गुंतवणूक करुन पर्यावरणावर होवू शकणारे दुष्पपरिणाम कमी करता आले. आम्ही राबवलेले पर्यावरणपूरक उपक्रम इतर उद्योगांसाठी एक आदर्श ठरतील.”

