पॉक्सो कायद्याअंतर्गत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली सदर बाजार पोलीस स्टेशन, सोलापूर येथे दिनांक ०३ मे २०२५ रोजी गु.र.क्र. ०४०३/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ६५, ७४, ७५, ७८, ७९, १२६(२), ३५१(२), ३५१(३), ३(५) तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा, २०१२ चे कलम ४, ८ व १२ अन्वये आरोपी १) कुणाल नागनाथ जल्ला (वय २३ वर्षे), २) ओंकार किशोर गोस्की (वय २० वर्षे) (दोन्ही रा. गांधी नगर, सदर बाजार, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.
फिर्यादीने दिनांक ०३/०५/२०२५ रोजी दिलेल्या जबाबात असा आरोप केला होता की, त्यांची अल्पवयीन मुलगी शाळेला येत-जात असताना शाळा परिसर व घराच्या आसपास आरोपींकडून वारंवार पाठलाग करण्यात आला. वाढदिवसाचे आमिष, चॉकलेट, भेटवस्तू देणे, मोबाईलवर चॅटिंगसाठी प्रवृत्त करणे, स्नॅपचॅट अॅपद्वारे संवाद साधणे, अश्लील मजकूर पाठवणे तसेच मोबाईलमध्ये फोटो काढून मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला होता. या आधारे सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपी संदीप राजु गोस्की, कुणाल नागनाथ जल्ला व ओंकार किशोर गोस्की यांना दिनांक ०३/०५/२०२५ रोजी अटक करण्यात आली होती. तद्नंतर आरोपींनी मे. जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर येथे जामीन अर्ज दाखल केला, सदर अर्ज मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. एस. व्ही. केंद्रे यांनी नामंजूर केला होता, तद्नंतर आरोपींनी मुंबई- उच्च न्यायालय, कोल्हापूर येथे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
संबंधित प्रकरणात आरोपीतर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की, आरोपी तरुण असून त्यांच्याविरुद्ध कोणताही पूर्वगुन्हेगारी इतिहास नाही. तपास पूर्ण झाला असून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपी तपासात सहकार्य करणारे असून पुराव्यांवर परिणाम करण्याची किंवा साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता नाही. केवळ आरोपांच्या आधारे दीर्घकाळ कारागृहात ठेवणे अन्यायकारक ठरेल, त्यामुळे योग्य अटी व शर्तींसह जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली.
सरकारतर्फे जामिनास विरोध करण्यात आला असला, तरी दोन्ही बाजूंचे सविस्तर युक्तिवाद ऐकून मा.मुंबई- उच्च न्यायालय, कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी दिनांक ०८ डिसेंबर २०२५ रोजी आरोपी कुणाल नागनाथ जल्ला व ओंकार किशोर गोस्की यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.
वरील प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी,ॲड. सौरभ तांदळे, ॲड. दत्तात्रेय कापुरे, ॲड. वैभव बोंगे, ॲड. ओंकार फडतरे, ॲड. मोहीम पठाण, ॲड. शिवरत्न वाघ, ॲड. मनिष बाबरे, ॲड. रोहित थोरात, ॲड. अभिषेक नागटिळक, ॲड. अजय वाघमारे व ॲड. त्वरिता वाघ यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे ॲड. प्रियंका राणे यांनी काम पाहिले.

