अवकाळी पावसामुळं राज्यातील 13 हजार 729 हेक्टरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यात आठ जिल्ह्यात या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतकरी नुकसानीच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीसांनी विधीमंडळात ही माहिती दिली. अवकाळी पावसामुळं गहू, ज्वारी, हरभरा, मका, द्राक्ष, आंबा, पपई, संत्रा या पिकांचं नुकसान झाले असून, तत्काळ नकसानग्रस्त भागाची माहिती शासनानं मागितली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक वाया गेली आहेत. त्यामुळं विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी सभागृहात केली. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागितले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
राजकारण करु नका, शेतकऱ्यांचा विषय
दरम्यान, नकसानीबाबत देवेंद्र फडणवीस माहिती सांगतना विरोधकांनी गोंधळ घातल्याचे पाहयला मिळालं. तत्काळ शेतकऱ्यांनी मदत करा अशी मागणी विरोधकांनी केली. यावेळी फडणवीस म्हणाले की, राजकारण करु नका, हा शेतकऱ्यांचा विषय आहे. शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कुठे किती झालं नुकसान
पालघर
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि जव्हार तालुक्यात या भागात 760 हेक्टरचे आंबा आणि काजूचे नुकसान झाले आहे.
नाशिक
नाशिक जिल्ह्यात 2 हजार 685 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. यामध्ये गहू, भाजीपाला, आंबा पिकांचा समावेश आहे.
धुळे
धुळे जिल्ह्यात 3 हजार 144 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. मका, गहू, हरभरा, ज्वारी, केळी पिकांचे नुकसान झाले आहे.
नंदूरबार
नंदूरबार जिल्ह्यात 1 हजार 576 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. यामध्ये मका, गहू हरभरा, ज्वारी, केळी, पपई ,आंबा या पिकांचं नुकसामन झालं आहे.
जळगाव
जळगाव जिल्ह्यात 214 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठं नकुसान झालं आहे.
अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं नुकसान झालं आहे. 4 हजार 100 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे.
बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यात 775 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालं आहे.
वाशिम
वाशिममध्ये 475 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झालं आहे. याबाबतची माहिती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली.