श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या ६८ व्या पुण्यतिथी महोत्सवास प्रारंभ
सोलापूर : प्रतिनिधी बाल पखवाजवादक वारकऱ्यांनी पखवाज वादनावर भाविकांना ठेका धरायला लावत रसिकांची मने जिंकली. निमीत्त होते श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या ६८ व्या पुण्यतिथी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज मृदंग वादन शिक्षण संस्थेतर्फे श्री सदगुरू प्रभाकर महाराज मंदिरात मंगळवारी झालेल्या सामूहिक पखवाज वादनाचे.
जुनी लक्ष्मी चाळ सोलापूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मृदंग वादन शिक्षण संस्थेतर्फे पखवाज वादनाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यालयातील ५० पेक्षा जास्त बाल वारकरी विद्यार्थी विद्यार्थिनींनी ह. भ. प. श्री ज्योतीराम महाराज चांगभले यांच्या मार्गदर्शनाखाली पखवाज वादन केले. श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या ६८ व्या पुण्यतिथी महोत्सवास प्रारंभ झाला असून मंगळवारी हा कार्यक्रम झाला. श्री दत्तात्रय महाराज सरवदे यांनी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांची भक्ती गीते सादर केली. प्रणिती चांगभले हिने बोलावा विठ्ठल, काया ही पंढरी, मन लागो रे लागो हे अभंग सादर केले व त्यावर विद्यार्थ्यांनी अप्रतिम असे मृदंग वादन केले. याप्रसंगी बाल मृदंग वादक विद्यार्थी विद्यार्थिनींनी व उपस्थित भाविकांनी फुगड्या व विविध प्रकारचे वारकरी खेळ सादर केले. याप्रसंगी ह. भ. प. श्री संजय महाराज पाटील (केगाव) यांनी आपली सेवा दिली. रवी वलपा, उद्धव उपाळकर, चंद्रशेखर ढोले, शरद डोके, नंदा डोके, सुभद्रा थोरात, सीता जाधव, शोभा चांगभले यांनी फुगडी सेवा व वारकरी खेळामध्ये सहभाग घेतला. याप्रसंगी मंदिराचे चीफ ट्रस्ट मोहन बोड्डू, मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, ट्रस्टी वसंतराव बंडगर, वामनराव वाघचौरे, उदय वैद्य, सुभाष बद्दुरकर, रवी गुंड सम्राट राऊत, रमेश देशमुख, रामचंद्र कटकधोंड, मंदिराचे व्यवस्थापक निरंजन दंतकाळे आदी उपस्थित होते.
बुधवारच्या नव्याच्या पौर्णिमेनिमित्त मंदिरामध्ये सायंकाळी सहा वाजता गोपूजन होणार आहे. तसेच रात्री आठ वाजता मंदिरामध्ये पालखी प्रदक्षिणेचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी यावेळी उपस्थित रहावे, आवाहन मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
