सोलापूर : रसायन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी बालाजी अमाईन्सला त्यांच्या उत्कृष्ट निर्यात कामगिरीबद्दल उद्योग मंत्रालय, महाराष्ट्र शासनाकडून सन २०१८-१९ आणि २०१९-२० साठी असे दोन पुरस्कार देण्यात आले. गुरुवारी पुणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कंपनीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनोद चुंगे यांनी पुरस्कार स्वीकारले, प्रमाणपत्र आणि २५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप होते. याप्रसंगी प्रधान सचिव – उद्योग डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, विकास आयुक्त (उद्योग) आणि निर्यात आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते.
यावेळी अधिक माहिती देताना कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक डी. राम रेड्डी यांनी सांगितले कि, १९८८ साली स्वदेशी तंत्रज्ञान वापरुन एका सयंत्रापासून सुरु करण्यात आलेल्या छोट्याश्या प्रकल्पापासून आज ४ मोठे प्रकल्प कार्यान्वित आहेत, ज्यात प्रामुख्याने जीवनावश्यक औषधे, शेती फवारणी औषधे, जलशुद्धीकरण, रंग, रबर, प्राण्यांसाठीचे खाद्य अश्या अनेक ठिकाणी बालाजी अमाईन्सच्या उत्पादनांचा वापर केला जातो. बालाजी अमाईन्सचे एक उत्पादन हे जागतिक स्तरावर वितरित होते ज्याचा वापर मधुमेहासारख्या आजारासाठी तयार होणाऱ्या औषधात केला जातो, त्याचे जगात सर्वाधिक उत्पादन करणारी कंपनी म्हणून बालाजी अमाईन्सचा लौकिक आहे.
कंपनीने नेहमीच अश्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले आहे ज्यात प्रामुख्याने भारतात आयात होणाऱ्या उत्पादनांचा समावेश आहे जे देशामध्ये कोणीही निर्माण करत नाहीत किंवा फारतर एखादे-दुसरे निर्माण करणारे असतील. पन्नासहून अधिक देशांना आपल्या मालाचा पुरवठा करणाऱ्या बालाजी अमाईन्सने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण दर्जेदार उत्पादनांमुळे जागतिक पातळीवर स्वतःचे स्थान निर्माण केले आहे
केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्यामुळे बालाजी अमाईन्सच्या कामगिरीचा आलेख वाढत असून या पुरस्काराचे श्रेय त्यांनी सर्व अधिकारी आणि कंपनीचे कर्मचारी यांना दिले.