राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहीका अलका इनामदार : मातृशक्ती पुरस्काराचे थाटात वितरण
सोलापूर : वेदकाळापासून भारतीय स्त्रिया सक्षम आणि साक्षर आहेत. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये स्त्री शक्ती सुप्त झाली आहे. स्त्रीशक्तीचे पुन्हा एकदा जागरण झाल्यास समाज परिवर्तन निश्चित होईल, असा विश्वास राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहीका अलका इनामदार यांनी व्यक्त केला. श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे देण्यात येणारा यंदाचा मातृशक्ती पुरस्कार अलका इनामदार यांना प्रदान करण्यात आला.
श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठात सोमवारी मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर प. पू. जडेसिद्धेश्वर महास्वामीजी, सुधीर इनामदार, मातोश्री प्रांजलम्मा शिवपुत्र आप्पाजी, ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया, मठाचे विश्वस्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी नेपाळ येथील रुद्राक्षांची माळ, मानपत्र, मानाची शाल, पुष्पहार घालून अलका इनामदार आणि सुधीर इनामदार यांचा सन्मान करण्यात आला.
अलका इनामदार म्हणाल्या, जेव्हा जेव्हा समाज गलितगात्र झाला, तेव्हा स्त्रियांनी खंबीरपणे उभे राहून समाजाचे रक्षण केल्याची कित्येक उदाहरणे आहेत. आधुनिक काळात स्त्रियांनी बौद्धिक युद्धात सहभागी होण्याची गरज आहे. समाज परिवर्तनासाठी स्त्रियांनी पुढाकार घेतला तर समाजातील दुष्पवृत्तीचा नाश होऊ शकतो. हिंदुत्वाचा विजय जगभरात होण्यासाठी महिलांचे योगदान आवश्यक आहे. त्याकरिता राष्ट्रसेविका समिती कार्यरत आहे, असेही अलका इनामदार यांनी सांगितले.
मठाचे विश्वस्त सतीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सुवर्णा कल्याणशेट्टी यांनी सूत्रसंचालन तर गिरीश गोसकी यांनी आभार प्रदर्शन केले.