येस न्युज मराठी नेटवर्क : प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीने छापे टाकल्यानंतर आता भोसले यांचा मुलगा अमित भोसले यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अमित भोसले यांना मध्यरात्री पुण्याहून मुंबईला आणण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.बुधवारी ईडीने अविनाश भोसले यांच्या ‘अबिल हाउस’ या कार्यालयावर छापे टाकले. फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली होती. परदेशातील खात्यामध्ये पैसे जमा केल्याच्या संशयावरून ‘ईडी’कडून तपास सुरू असल्याचे बोलले जात आहे. मध्यरात्री तपासणी पूर्ण झाल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तसेच, कार्यालयात सापडलेली कागदपत्रेही मुंबईला नेण्यात आली आहेत.