कोलकाता : साखळी सामन्यात वाघासारखी कामगिरी करून मोठ्या लढतीत कागदी वाघ होण्याची परंपरा आजही दक्षिण आफ्रिकन फलंदाजीची राहिली. 1999 चा इतिहास पुसून टाकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेची टीम तुटून पडेल, अशी चर्चा होती. मात्र, कोलकाताच्या इडन गार्डनवर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर सपशेल नांगी टाकली. कॅप्टनसी सोडून दुसंर काहीच करू न शकलेला बवुमा स्वस्तात बाद झाल्यानंतर डाॅट बाॅलच्या प्रेशरमध्ये डिकाॅकही बाद झाला. त्यानंतर वॅन देर दसेन आणि एडन मारक्रमही बाद झाला. त्यामुळे 12व्या षटकात 4 बाद 44 अशी स्थिती झाली. आफ्रिकेच्या इनिंगचा पहिला चौकार आठव्या षटकात आला.
दक्षिण आफ्रिकेची स्थिती अत्यंत नाजूक झाल्यानंतर पाऊसही त्यांच्या पाचवीला पुजलेला आला असल्याने खेळ थांबला आहे. मात्र, टीम इंडियाशी फायनलला दोन हात करण्याकडे ऑस्ट्रेलियाने एक पाऊल टाकलं आहे. क्लासेन आणि मिलर किती धावसंख्या उभारून देतात, यावर आफ्रिकेचं भविष्य असेल. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकल्यानंतर बावुमा म्हणाला, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करू. उपांत्य फेरीच्या सामन्यात आम्ही ऑस्ट्रेलियासारख्या संघाचा सामना करत आहोत, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आम्हाला फक्त आमच्या गेम प्लॅनवर चिकटून राहावे लागेल. आमच्या संघात न्गिडीच्या जागी शम्सी आणि फेहलुकवायोच्या जागी यान्सेन आहे.