मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणी पोलिसांचा नेमका तपास कुठपर्यंत आलाय याबाबतची माहितीस देण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्याने शासनाचा अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. तसेच पीडित महिलेच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहायता निधीतून तसेच शासनाच्या विविध योजनांमधून 20 लाखांची मदत केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल
“पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्याने शासनाचा एससी एसटी अॅक्ट या गुन्ह्याला लावलेला आहे. त्याअनुषंगाने तपास सुरु आहे. आपण आरोपीला अटक केली असून 21 तारखेपर्यंत कस्टडीत आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने सर्व घटनेची माहिती दिली आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.
वकील राजा ठाकरे यांची नेमणूक
“घटनास्थळावर पीडित महिला कधी आली, आरोपी कधी आला, गुन्हा कसा घडला, त्यानंतर आरोपी कसा पळून गेला, या सगळ्याची पुराव्यासकट माहिती मिळाली आहे. आरोपीकडे असणारं प्रमुख हत्यारंही आपण जप्त केलं आहे. या संवेदनशील गुन्ह्यासाठी स्पेशल वकील राजा ठाकरे यांची नेमणूक केली आहे. ते आपल्याला तपासात मार्गदर्शन करत आहेत”, असं नगराळे यांनी सांगितलं.