रे नगरच्या पायाभूत व नागरी सुविधांसाठी महत्वाची बैठक
सोलापूर :- सोलापुरातील ३० हजार असंघटीत कामगारांच्या आयुष्यात सुवर्णक्षण नोव्हेंबर महिन्यात येणार आहे. घर नाही त्याला घर सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला हक्काचे घर रे नगर मार्फत मिळवून देताना अत्यंत आनंद होत आहे. श्रमिकांच्या या घरांच्या हस्तांतरणसाठी दस्तुरखुद पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी येत आहेत. या सोहळ्याच्या जय्यत तयारीसाठी रे नगर फेडरेशन कटिबद्ध असून लाभार्थ्यांचे सर्व प्रक्रिया पूर्ण केलेले आहेत. याचा पाठपुरावा थेट पंतप्रधान आवास योजना कार्यालयातून होत असून दि. ८ व ९ जुलै २०२३ रोजी पंतप्रधान आवास योजना कार्यालयातून केंद्रीय स्तरावरचे अधिकारी येत आहेत. याच अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अत्यंत जाणीवपूर्वक सर्व कामांना गती देत आहेत. विशेष म्हणजे आज शासकीय कामानिमित्त पुणे येथे असताना सुद्धा व्ही.सी. द्वारा आढावा बैठक घेतले. त्यांचे विशेष आभार फेडरेशनच्या वतीने मांडण्यात येत असल्याची प्रतिक्रिया रे नगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान आवास योजना शहर भाग घर नाही त्याला घर सहकार तत्वावर परवडणाऱ्या दरात अंतर्गत कुंभारी येथे साकारत असलेल्या रे नगर को-ऑप. हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या मार्फत ३० हजार असंघटीत कामगारांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर चालू आहे. यातील पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरे नोव्हेंबर महिन्यात मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते हस्तांतरण करण्यात येणार आहे. या अनुषंगाने मुंबई येथे म्हाडा कार्यालयात दि. ३ जुलै २०२३ रोजी रे नगरच्या कामाच्या प्रगती संदर्भात म्हाडाचे उपाध्यक्ष यांच्या समक्ष बैठक पार पडली. याच बैठकीच्या अनुषंगाने ५ जुलै रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे रे नगर च्या पायाभूत व नागरी सुविधा तसेच रे नगर चे काम युद्धपातळीवर पूर्णत्वास येण्यासाठी खातेनिहाय संबंधित सक्षम अधिकारी यांची बैठक मा. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व्ही.सी. द्वारा घेतले. या बैठकीस मा. उपजिल्हाधिकारी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, रे नगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर), रे नगर फेडरेशनचे चेअरमन कॉ. नलिनीताई कलबुर्गी, सचिव कॉ. युसुफ शेख (मेजर), विकासक अंकुर पंधे, अभियंता मेहुल मुळे, लक्ष्मण माळी, वीरेंद्र पद्मा, अँड. अनिल वासम आदि उपस्थित होते.
रे नगर येथे वीज, २४ तास पाणी, मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते, पथदिवे, शाळा, अंगणवाडी, वनीकरण या सारख्या निगडीत अत्यंत महत्वाच्या विषयावर सर्व संबंधित खात्याचे सक्षम अधिकारी यांच्याशी स्वतः जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आढावा घेऊन सदरचे काम युद्धपातळीवर पूर्ण होण्यासाठी येत असलेल्या समस्या व त्यासाठी करावी लागणारी उपाययोजना, तसेच लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अत्यल्प व्याज दरात कर्जाची उपलब्धता करून देणे या संदर्भात सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक व सक्षम अधिकारी यांचा देखील आढावा घेऊन सखोल चर्चा केली व पुढील कार्याचे आदेश निर्गमित केले