राजन दीप, शुभ शर्मा यांची अर्धशतके तर विकी ओस्तवाल चे 4 बळी सकट नाबाद 89 धावांची अष्टपैलू खेळी
सोलापूर : गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या महाराष्ट्र विरुद्ध झारखंड सामन्यात तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राने झारखंड संघाला 292 धावावरती रोखले आणि दिवस अखेरीला हवामानात बदल झाल्याने अंधुक प्रकाशामुळे लवकर खेळ थांबला तेंव्हा महाराष्ट्राने दुसऱ्या डावात 2 बाद 172 धावा केल्याने 357 धावांची आघाडी घेतली आहे.कालच्या धावसंख्येवरून सकाळी झारखंड ने पुढे खेळताना 10 षटकात 25 धावांची भर घातली आणि 58 धावांची भागीदारी केली असताना सत्या सेतू (31) विकी ओस्तवाल चे गोलंदाजीवर यष्टिरक्षक कडे झेल देत बाद झाला. कर्णधार राजन दीप ने त्यानंतर आलेल्या शुभ शर्मा सोबत पाचव्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी रचली ती दोघांनी केलेल्या संयमी अर्धशतकांच्या जोरावर.
पहिल्या डावाच्या आधारे विजय मिळविण्यासाठी वापरलेली फिरकी गोलंदाजी सहज खेळत असल्याचे पाहून महाराष्ट्र कर्णधाराने पुन्हा मध्यमगती गोलंदाजी सुरू केली आणि अजय बोरुडे ने कर्णधार राजन दीप (68, 136 चेंडू, 7 चौकार) याला झेल बाद केले व पुढच्याच चेंडूवर कौनैन कुरेशी याला देखील माघारी धाडले. प्रभात कुमार माहतो याचे सोबत शुभ शर्मा ने जेवणाला खेळ थांबेपर्यंत संघाची धावसंख्या 253 (91 षटके) पर्यंत नेली तेव्हा शुभ शर्मा 55 वर नाबाद होता.
दुसऱ्या सत्रात मात्र केवळ 39 धावांची भर घालत झारखंडचा पहिला डाव 292 वर संपुष्टात आला तो प्रभात कुमार माहतो (15) याला वैभव दारकुंडे ने आणि मनिषी (1), अमित कुमार (0), शुभ शर्मा (79) यांना विकी ओस्तवाल ने बाद केल्याने.
पहिल्या डावात 185 धावांची मजबूत आघाडी मिळाल्यावर फॉलो ऑन न देता महाराष्ट्र संघाने पुन्हा फलंदाजी करण्याच्या निर्णय घेत सलामीला नीरज जोशी सोबत विकी ओस्तवाल याला पाठविले आणि पहिल्याच षटकात चौकार लगावत नीरज ने दमदार सुरुवात करत पहिल्या 9 षटकात दोघांनी 38 धावा जोडल्या. पण कौनैन कुरेशी याने निरजला (22) पायचीत करत जोडी फोडली.
त्यानंतर कर्णधार सचिन धस फलंदाजीला आला आणि पुढील 6 षटकात दोघांनी फटकेबाजी करत 44 धावांची भागीदारी केली आणि पहिल्या डावात धमाकेदार 200 धावा केलेल्या सचिनला (33) अमित कुमारने स्वतःच्या गोलंदाजीवर बाद केले.
पुढील भरवशाचा फलंदाज दिग्विजय पाटील सोबत विकी ओस्तवाल ने 50 धावांची भागीदारी करताना अष्टपैलू खेळी करत आपले वैयक्तिक अर्धशतक देखील पूर्ण केले ते 5 चौकार, 4 षटकार लगावत.दिग्विजय सोबत विकी ने संघाचे शतक मग दीडशे धावा पूर्ण केल्या त्या चौफेर फटकेबाजी करत.दिवसाचे 90 षटके पूर्ण होण्याच्या आधीच अचानक हवामानात बदल होऊन जोराचा वारा वाहू लागल्याने व अंधुक प्रकाशामुळे पंचांनी खेळ थांबविला तेव्हा 10 चौकार, 5 षटकार खेचत विकी 89, तर दिग्विजय पाटील 18 धावांवर नाबाद असून शेवटच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्र संघ आणखी किती धावा करतो हे आणि सोलापूरचा आर्शिन कुलकर्णी ची खेळी पाहणे, तसेच सामना अनिर्णित राहून पहिल्या डावाच्या आधारे निकाल लागतो की संपूर्ण हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ह्या सामन्यातील विजयी संघ मुंबई विरुद्ध कर्नाटक या सामन्यातील विजयी (मुंबई) संघाशी 1 मार्च पासूनच्या उपान्त्य सामन्यात भिडणार आहे.

