जागतिक बँकेकडून कौशल्य विकास विभागाला 1200 कोटी तर केंद्रशासन 100 कोटी निधी देणार
कौशल्य विकास विभागाकडून सोलापूर जिल्ह्यातील 12 शासकीय आयटीआय ला प्रत्येकी 1.25 कोटीचा निधी नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी देणार
सोलापूर, दिनांक 6(जिमाका):- कौशल्य विकास विभाग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी सहा प्रकारचे न्यू एज कोर्सेस सुरू करत आहे. यापैकी सोलापूर जिल्ह्यातील सर्व 12 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी किमान एक नवीन अभ्यासक्रम यावर्षीपासून आपल्या संस्थेत सुरू करावा. मशिनरी व अन्य बाबीसाठी प्रत्येक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला 1.25 कोटीचा निधी विभागामार्फत उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.



जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कौशल्य विकास विभागाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत लोढा बोलत होते. यावेळी कौशल विकास विभागाचे मुंबई येथील सहसंचालक अनिल जाधव, पुणे येथील उपसंचालक चंद्रशेखर ढाकणे, उपयुक्त अनुपमा पवार, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी सुरेश भालचीम, सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे, मित्रा संस्थेचे अधिकारी पंकज जयस्वाल यांच्यासह सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य उपस्थित होते.
यावेळी लोढा म्हणाले की राज्याच्या कौशल्य विकास विभागाला कौशल्य आधारित उपक्रम राबवण्यासाठी जागतिक बँकेकडून बाराशे कोटीचा निधी मिळणार आहे तसेच केंद्र शासनही 100 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. या विभागाला निधीची कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. त्यामुळे सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने आपल्या प्रशिक्षण संस्थेत यावर्षीपासून किमान एक नवीन अभ्यासक्रम सुरू करावा. कौशल्य विकासाचे महत्त्व याविषयी जनजागृती करून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली पाहिजे, या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी निर्देशित केले.
कौशल्य विकास विभागाने न्यू एज कोर्सेसच्या माध्यमातून रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, थ्रीडी प्रिंटिंग, इलेक्ट्रिक वेहिकल साठी ईव्ही टेक्निशियन, सोलर टेक्निशियन हे कोर्सेस सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे सर्व कोर्सेस भविष्याच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण असून या अंतर्गत प्रशिक्षित होणारा विद्यार्थी रोजगारक्षेम होईल याची खात्री आहे. या क्षेत्रात जिल्ह्यातील सर्व शासकीय प्रशिक्षण संस्थांनी आपापले अभ्यासक्रम डिझाईन करावेत. यासाठी प्रत्येकी 1.25 कोटीचा निधी उपलब्ध करण्यात येईल. यामध्ये 75 लाख मशिनरी, 25 लाख बांधकामासाठी व 25 लाख फर्निचर व अनुषंगिक साहित्य खरेदी करण्यासाठी वापरता येणार असल्याचे लोढा यांनी सांगितले.
महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अनुक्रमे सोलार टेक्निशियन व इंटरनेट ऑफ थिंग्स हा नवीन अभ्यासक्रम सुरू करत असल्याबद्दल मंत्री लोढा यांनी समाधान व्यक्त केले तसेच अन्य सर्व प्राचार्यांनी याबाबत प्रयत्न करावेत असे सांगितले. तसेच सोलापूर टेक्स्टाईल हब असल्याने त्यावर आधारित अभ्यासक्रम नियोजित करण्याबाबत सांगितले. प्रत्येक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी असलेल्या आय एम सी चे सदस्य क्रियाशील आहेत का नाही याबाबतची माहिती घेऊन जे अध्यक्ष व सदस्य अक्रियाशील आहेत, त्यांच्या जागेवर नवीन क्रियाशील सदस्यांची नियुक्ती करण्याचे प्रस्ताव त्वरित पाठवण्याचे निर्देश श्री. लोढा यांनी दिले. त्याप्रमाणेच प्रत्येक आयटीआय ने किमान एक रोजगार मेळावा घ्यावा व त्यामध्ये किमान 50 विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करण्याबाबत ही सूचित केले.
प्रारंभी जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी सुरेश भालचिंग यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुरू असलेल्या कोर्सेस ची माहिती दिली. तसेच न्यू एज कोर्सेस मध्ये जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय आयटीआय सहभागी होऊन नवीन अभ्यासक्रम सुरू करतील करतील असे त्यांनी सांगितले.
*जनता दरबार –
यावेळी जनता दरबारात आलेल्या नागरिक नागरिकांच्या तक्रारी तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसंबंधी असलेल्या सूचना व मागण्या या दृष्टीने कौशल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी निवेदने स्वीकारली. तसेच आलेल्या सूचनावर सकारात्मक निर्णय घेतले जातील असे सांगितले.
*इंडस्ट्रियल मीट –
सोलापूर शहर व जिल्ह्यातील जवळपास दीडशे उद्योजकांशी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी निवेदन भवन येथील सभागृहात संवाद साधला. उद्योजक व उद्योगांच्या अडीअडचणी यांची माहिती घेऊन त्यावर शासन सकारात्मक दृष्टीने विचार करेल असे त्यांनी सांगितले. तसेच उद्योजकांनीही शासनाच्या रोजगार मेळाव्यात सक्रिय सहभागी होऊन कौशल्य प्रशिक्षण मिळालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या कंपन्यांमध्ये संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमदार देवेंद्र कोठे, रोहिणीताई तडवळकर, शशांक चव्हाण यांच्या सह कौशल्य विभागाचे विभाग व जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.