येस न्युज नेटवर्क : जम्मू-काश्मीरविधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी (26 ऑगस्ट) पुन्हा एकदा उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. यात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी 15 उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. तत्पूर्वी, सकाळच्या सुमारास भाजपने 44 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. मात्र, केवळ दोन तासांच्या आतच ती मागे घेण्यात आली आणि काही सुधारणा करून यादी पुन्हा जारी केली जाईल, असे म्हटले होते.
सकाळी 10 वाजता भाजपने पहिली यादी जाहीर केली होती. मात्र, काही बदलांसह नवी यादी जाहीर करण्या येईल, असे सांगत दुपारी 12 वाजताच्या सुमारास ती मागे घेण्यात आली. यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर नवीन यादी जाहीर करण्यात आली. या यादीत 15 उमेदवारांची नावे आहेत. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या यादीत तीन टप्प्यांसाठी 44 उमेदवारांची नावे होती. तर नंतर जाहीर करण्यात आलेल्या नव्या यादीत पहिल्या टप्प्यातील 15 उमेदवारांची नावे आहेत.
भाजपने ज्या 15 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, त्यांत 8 मुस्लीम उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. हे मुस्लीम उमेदवार ज्या जागांवर निवडणूक लढवत आहेत, त्या अधिकांश जागा काश्मीर खोऱ्यात आहेत. यात, इंजिनिअर सय्यद शौकत मयूर अंद्राबी, अर्शीद भट्ट, जावेद अहमद कादरी, मोम्मद रफीक वानी, अधिवक्ता सय्यद वजाहत, सोफी यूसुफ, तारीक कीन आणि सलीम भट्ट यांना उमेदवारी देण्यात आली आहे.