मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना आणि काँग्रेस वगळता इतर सर्व पक्षांच्या उमेदवारांना एकडून तिकडून मते गोळा करावी लागणार आहेत. अशातच एकेक मत महत्वाचे असताना काँग्रेसचे बरेचसे आमदार फुटल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यातच एक आमदार एवढी महत्वाची निवडणूक असताना पंढरपूर वारीला निघून गेल्याने खळबळ उडाली आहे.
पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप हे वारीला गेले आहेत. यामुळे ते मतदानाला उपस्थित राहतील की नाही हे काँग्रेसही सांगू शकत नाहीय. जगताप यांनी याबाबत पक्षाला कळविले होते, असे काँग्रेसने स्पष्ट केल्याचे वृत्त आजतकने दिले आहे. तर अन्य दोन बैठकीला अनुपस्थित असलेल्या आमदारांपैकी एक अशोक चव्हाणांचे खास जितेश अंतापुरकर आणि नुकतेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले बाबा सिद्धीकी यांचे पूत्र जीशान सिद्धीकी हे आहेत.
काँग्रेसकडे जादाची १४ मते आहेत. यामुळे आणखी काही आमदार महायुतीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. सुलभा खोडके आणि हीरामन खोसकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. नवाब मलिक देखील विधानभवनात पोहोचले आहेत. मलिकांनी काल शरद पवार गटाच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यांनी शरद पवार, जयंत पाटलांचीही भेट घेतल्याची चर्चा आहे. यामुळे मलिक अजित पवारांच्या उमेदवाराला मतदान करतात की शरद पवारांच्या याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.