जिल्ह्यात १२ हजार ६६६ पात्र लाभार्थीना प्रमाणपत्राचे वाटप
सोलापूर – दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनेच्या लाभासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र त्यांना सहजरित्या उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान राबविण्यात आले. जिल्ह्यात दिव्यांग बांधवासाठी अस्मिता अभियान यशस्वी झाले असून जिल्ह्यातील १२ हजार ६६६ पात्र लाभार्थींना विशेष प्रमाणपत्राचे घरपोच वाटप करण्यात येत आहे.
जिल्ह्याचे हे भौगोलिक आवाहन लक्षात घेता जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मोहिमेचे नोडल अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा समाजकल्याण अधिकार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मिशन इन्स्टिट्यूट ट्रेनिंग रिसर्च अँड एक्शन( मित्र) संस्थेचे अध्यक्ष अभिजित राऊत, सचिव संजय पुसाम यांच्या सहकार्याने संपूर्ण जिल्ह्यात शासन आपल्या दारी ही मोहिम राबविली गेली.
या मोहिमेची तिन टप्प्यांत विभागणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यात गटविकास अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, आशा ताई, अंगणवाडी सेविका, समग्र शिक्षण अभियान, राष्ट्रीय बाल विकास प्रकल्प, पालक संघटना, दिव्यांग व्यक्तींच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, संघटना यांचे सहकार्य लाभले. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ज्या व्यक्तींजवळ नविन दिव्यांगत्व प्रमाणपत्र नाही अशा एकूण १५ हजार ६६६ दिव्यांग व्यक्तींची प्राथमिक माहिती प्राप्त केली. तसेच समग्र शिक्षा अंतर्गत०-१८ वयोगटातील शिक्षण घेणाऱ्या एकूण १०१० बौधिक अक्षम बालकांसाठी ४३ बुध्दीगुणांक प्रामथिक तपासणी शिबिरे घेण्यात आली. दुस-या टप्प्यात जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये ३८ दिवसांत २५ शिबिरांची मोहिम यातून राबविली गेली. विशेष म्हणजे यात तब्बल १५हजार ६६६ दिव्यांग बांधवांची प्राथमिक तपासणी पूर्ण होऊ शकली. यातून पात्र ठरलेल्या १२ हजार ६६६ लाभार्थी दिव्यांग बांधवांना पुढील ६० ते ९० दिवसांमध्ये आता दिव्यांग प्रमाणपत्र घरपोच उपलब्ध होऊ शकणार आहे.
केंद्रिय सामाजिक न्याय विभागाने घेतलेल्या पुढाकारातून २०१८ मध्ये जिल्हा पातळीवर युनिव्हर्सल आयडी फॉर डिसॅबलिटी (युडीआयडी) प्रणाली सुरू झाली. २०११ च्या जनगनणेनुसार सोलापूर जिल्ह्यात १ लक्ष १६ हजार दिव्यांग व्यक्ति आहेत. ज्यामध्ये ६८ टक्के ग्रामीण भागात तर ३२टक्के शहरी भागात राहतात. या मोहिमेच्या माध्यमातून सोलापूर वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाने मागील गेल्या पाच वर्षांत फक्त ४० हजार दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र वाटप केले गेले. ही प्रक्रिया करताना तपासणी, निदान, प्रमाणपत्रासाठी किमान ३ ते ४ वेळा दिव्यांगांना जिल्हा मुख्यालय गाठावे लागत होते. मात्र जिल्हा प्रशासन आणि मित्र स्वयंसेवी संस्थेच्या संवेदनशील पुढाकारातून पाच महिन्यांत राबविलेल्या मोहिमांमधून दिव्यांग बांधवांना एकाच भेटीत जिल्हा मुख्यालयाऐवजी तालुका पातळीवचर दिव्यंगत्वाचे निदान शक्य झाले.
दिव्यांग अस्मिता अभियानांतर्गत तपासणी आणि निदान करून प्रमाणपत्रासाठी पात्र ठरलेले तालुकानिहाय दिव्यांग बांधव पंढरपूर-९५७, अक्कलकोट- १३३७, बार्शी- ११५०, माळशिरस-१३१०, सांगोला-१२९०, करमाळा-११४०, मोहोळ -१३६०, माढा-८०४, मंगळवेढा-६१०, सोलापूर (दक्षिण)- ७९०, सोलापूर (उत्तर)- ४१० असे ११ हजार १५८ तसेच काही लाभार्थींना जिल्हा पातळीवर रेफर करण्यात आले आहे. त्यातून संभाव्य १५०८ लाभार्थी पात्र होऊ शकतात. असे एकूण १२ हजार ६६६ लाभार्थींना दिव्यांग प्रमाणपत्रासोबतच शासनाच्या विविध योजनांचे माहिती पत्रक, जिल्हा परिषदेच्या योजनांचे माहिती पत्रक, रेल्वे सवलत प्रमाणपत्र, शुभेच्छा पत्र, यु.डी.आय.डी. कार्डची छांयाकित प्रत असे सर्व कागदपत्रे एका बंद लिफाप्यात त्याच्या घरपोच देण्यात येत आहेत.
‘दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियाना’ द्वारे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र घरपोच देण्यासाठी एक उपयुक्त असा उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला. फक्त दिव्यांगत्व प्रमाणपत्र देणे हे आमचे उद्दिष्ट नसून, पुढील टप्प्यात विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळवून देणे हे आहे, त्यामुळे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास नक्कीच मदत होईल. ‘जागतिक दिव्यांग दिनाच्या’ सर्व दिव्यांगांना हार्दिक शुभेच्छा…