६२ व्या राज्य नाट्य स्पर्धेत करिता महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या चंद्रपूर येथील अंतिम फेरीत सोलापूरच्या अश्विनी तडवळकर आणि कुर्डूवाडी च्या डॉ. संतोष सुर्वे या दोघांनी अभिनयाचे सर्वोत्कृष्ट रौप्यपदक प्राप्त केले आहे.
२० फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत संपन्न झालेल्या चंद्रपूरच्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक कला सभागृहात या स्पर्धा सलग सुरू होत्या. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ३८ नाटकांनी सहभाग नोंदविला होता जवळपास दीड हजार कलावंतांनी या कलाकृतींमध्ये सहभाग नोंदविला होता. त्यात सोलापूरच्या ” झपुर्झा” या नाट्य संस्थेने प्राथमिक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून अंतिम मध्ये सहभाग नोंदवला होता. यात इरफान मुजावर लिखित समांतर नाटकातील सुधा या भूमिकेसाठी स्त्री अभिनयाचे सर्वोत्कृष्ट रौप्यपदक पटकाविले आहे. चांदीचे रौप्यपदक आणि २० हजार रुपये असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे तर डॉ. संतोष सुर्वे यांनी सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक स्पर्धेत सांघिक द्वितीय क्रमांक पटकावत शोधकला व क्रीडा संस्थेच्या वतीने दुसरा अंक हे नाटक सादर केले होते. त्यात त्यांना लेखकाच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील सोलापुरात झालेल्या प्राथमिक स्पर्धेत याच नाटकांसाठी आणि याच भूमिकांसाठी तडवळकर आणि डॉ. सुर्वे यांना अभिनयाचे सर्वोत्कृष्ट रौप्यपदक प्राप्त झाले होते.