पोहण्यासाठी कॅनलमध्ये उतरले असता ही दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. तर वाहून गेलेल्या तरुणांच्या मृतदेहाचा शोध उशिरापर्यंत सुरू होता
सांगली: जिल्ह्यातील मिरज तालुक्यातल्या बेडगमधील म्हैसाळ कॅनलमध्ये बुडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर यामध्ये वाहून जाणाऱ्या तिसऱ्या तरुणाला वाचण्यात यश आले आहे. मृत तरुण सांगलीच्या माधवनगर येथील आहेत. पोहण्यासाठी कॅनलमध्ये उतरले असता ही दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. तर वाहून गेलेल्या तरुणांच्या मृतदेहाचा शोध उशिरापर्यंत सुरू होता. या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथे दोन तरुण म्हैसाळ कालव्यात वाहून गेल्याने बुडाले आहेत. तर वाहून जाणाऱ्या एका तरुणाला वाचवण्यात यश आले आहे. सलमान तांबोळी (वय 21) आणि आरमान हुसेन मुलाणी (वय 16) अशी मृत तरुणांची नावे आहेत. तर नदीम फिरोज मुलाणी असे वाचलेल्या तरुणाचे नाव आहे. बेडगच्या म्हैसाळ मुख्य कालव्यात पोहण्यासाठी उतरले असता ही घटना घडली आहे. हे तिघेही माधवनगर येथील आहेत. सदर तरुणापैकी सलमान टेम्पो चालक असल्याने भाडे घेऊन तो बेडग येथे आला होता. यावेळी त्याच्या सोबत आरमान मुलाणी व नदीम मुलाणी हे दोघेही आले होते.
सध्या म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाण्याचे आवर्तन सुरू असल्याने बेडग येथील मुख्य कालवा प्रवाहित आहे. सदरचे पाणी पाहून पाण्यात उतरून पोहण्याचा मोह तिघांना आवरला नाही. तिघेही या प्रवाहित पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्यानं तिघेही वाहू लागले. त्यांचा आरडाओरडा सुरु झाल्यावर आसपास असणाऱ्या ग्रामस्थांनी धाव घेऊन वाहून जाणाऱ्या नदीम मुलाणीला वाचवण्यात यश मिळवले. मात्र सलमान तांबोळी आणि आरमान मुलाणी हे दोघेही वाहून गेले.
या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर आयुष्य हेल्पलाइन टीमकडून वाहून गेलेल्या दोघा तरुणांचा शोध सुरू करण्यात आला होता. उशिरापर्यंत या दोघांच्या मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दोन सख्ख्या भावांचा करुण अंत
काही दिवसांपूर्वी बेडगमधील शेततळ्यात सख्ख्या दोन चिमुरड्या भावडांचा बुडून दुर्दैवी अंत झाला होता. अयाज युनूस सनदी (वय 10) आणि आफान युनूस सनदी (वय 7) असे दुर्दैवी अंत झालेल्या बालकांची नावे आहेत जिल्हा परिषद शाळा नागरगोजेवाडीत सख्खे भाऊ शिकत होते. शाळा सुटल्यावर घरी निघाले असताना गावातील नागरगोजे वस्तीवरील तलावाशेजारून जाताना लहान भावाचा पाय घसरला आणि तो पडला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी मोठ्या भावाने पाण्यात उडी घेतली. यावेळी लहान भावाने मोठ्या भावाला मिठी मारल्याने दोघेही बुडाले