सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवकुमार गणपूर यांची नियुक्ती झाली असून त्यांनी बुधवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम यांच्याकडून डॉ. गणपूर यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. महेश माने, प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुरेश पवार आदी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी हित लक्षात घेऊन परीक्षा विभागाचा कारभार सर्वांच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने आपण सांभाळण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही डॉ. गणपूर यांनी यावेळी दिली.