येस न्युज मराठी नेटवर्क : संतोष परब हल्लाप्रकरणात सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने बुधवारी भाजप आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर केला. या जामिनासाठी राणे कुटुंबीय गेल्या महिनाभरापासून प्रतिक्षा करत होते. परिणामी आजचा निकाल हा राणे कुटुंबीयांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. त्यामुळेच नितेश राणे यांना जामीन मिळताच न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना निलेश राणे यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. प्रसारमाध्यमांसमोर बोलताना त्यांचा चेहराही चांगलाच खुलला होता. आजचा दिवस हा आमच्यासाठी आनंदाचा आहे. सगळ्याच गोष्टी आज बोलणार नाही, असे निलेश राणे यांनी म्हटले.
नितेश राणे यांच्याबाबत सगळ्याच गोष्टी आज बोलून उपयोग नाही. त्या बाहेर काढायच्या असतील तेव्हा काढू. न्यायालयाच्या प्रक्रियेनुसार आज नितेश राणे यांना जामीन मिळाला. त्याचा आम्हाला आनंद आहे. सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही, ही म्हण यानिमित्ताने पुन्हा सिद्ध झाली, असे निलेश राणे यांनी म्हटले. तसेच नारायण राणे यावर लवकरच बोलतील, असेही नीलेश यांनी सांगितले.