नागपूर : भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गळ्यात हार घालून अभिनंदन केलं. फडणवीसांनी आपल्या गळ्यात विजयाची माळ घातल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे भावूक झाले. त्यांनी फडणवीसांची गळाभेट घेतली. बराचवेळ त्यांनी फडणवीसांच्या खांद्यावर डोकं ठेवलं. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. बावनकुळेंना अश्रू अनावर झाल्याचं पाहून फडणवीस यांनाही काही क्षण गहीवरून आलं होतं.
चंद्रशेखर बावनकुळे हे विजयी झाल्याचं घोषित करण्यात आल्यानंतर भाजपने त्यांची विजयी मिरवणूक काढली. ही मिरवणूक सुरू होण्यापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळेंची भेट घेतली आणि त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी फडणवीस यांनी आपल्या गळ्यातील विजयाचा हार फडणवीसांच्या गळ्यात घातला. फडणवीसांनी हा हार काढून तो बावनकुळे यांच्या गळ्यात घालून त्यांचं अभिनंदन केलं. फडणवीसांनी गळ्यात हार घालताच बावनकुळे यांना गहिवरून आलं. त्यांनी लगेचचं फडणवीसांना कडकडून मिठी मारली. बराच वेळ त्यांनी फडणवीसांना मिठी मारली होती. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. बावनकुळेंच्या डोळ्यातील अश्रू पाहून फडणवीसही अस्वस्थ झाले होते.