सोलापूर,दि.1: जिल्ह्यातील व्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या आणि शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांनी पंडित दीन दयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी swayam.mahaonline.gov.in या संकतस्थळाद्वारे 15 मार्च 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी शुभांगी कांबळे यांनी केले आहे.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय वसतीगृह योजना कार्यान्वित आहे. 2019-20 या शैक्षणिक वर्षांपासून मोठी शहरे (महानगर), विभागीय स्तर, जिल्हास्तर, तालुकास्तरावर इयत्ता 10 वीनंतरच्या दोन वर्ष किंवा अधिक कालावधीच्या तंत्र शिक्षण व व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला आहे. मात्र शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वयंम योजनेंतर्गत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात थेट रक्कम वितरित करण्यात येणार आहे.
महानगरपालिका, नगरपालिका हद्द आणि हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरात असलेल्या महाविद्यालयात/ शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थी स्वयंम योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. विद्यार्थ्यांनी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन श्रीमती कांबळे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी प्रभारी सहायक प्रकल्प अधिकारी विशाल सरतापे (8668774254) किंवा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, प्लॉट नं 2, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, आर्किटेक्ट कॉलेजजवळ, कुमठा नाका परिसर, सोलापूर, दूरध्वनी क्र.0217-2607600 यांच्याशी संपर्क साधावा.