पुणे : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांना पुणे क्राइम ब्रांचने अटक केली आहे. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. याच आरोपाखाली शिवानी अग्रवाल यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप देखील शिवानी अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवानी अग्रवाल या घरी नव्हत्या. पोलिसांनी त्यांना शोधून काढलं आहे आणि आज न्यायालयासमोर शिवानी अग्रवाल यांना हजर करण्यात येईल.
पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच आज अल्पवयीन मुलाचीची चौकशी करणार आहेत. सहाय्यक पोलिस आयुक्त आणि दोन महिला पोलिसांकडून अल्पवयीन मुलाची चौकशी करण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलाने दोघांना भरधाव पोर्शे कारने चिरडलं होतं. अपघातानंतर अल्पवयीन मुलाची कोणतीही चौकशी झाली नव्हती किंवा कोणताही जबाब नोंदवण्यात आला नव्हता. पुणे पोलिसांनी बाल हक्क न्याय मंडळाला पत्र लिहून अल्पवयीन मुलाच्या चौकशीची परवानगी मिळण्यासाठी मागणी केली होती. त्यानंतर आता बाल हक्क न्याय मंडळाने पोलिसांना चौकशीसाठी परवानगी दिली आहे. या चौकशीदरम्यान अल्पवयीन मुलाला घटनेसंबंधित अनेक प्रश्न विचारले जातील. बाल हक्क न्याय मंडळाचा एक सदस्य चौकशीच्या वेळी उपस्थित असतील. न्यायालयाने अल्पवयीन मुलाच्या पालकांना उपस्थित राहण्यास सांगितल आहे. मात्र, अल्पवयीन मुलाचे वडील कोठडीत आहेत आणि आई अज्ञातवासात आहे. अल्पवयीन मुलाच्या भावाला देखील पत्र पाठवून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे.
बाप-लेकास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने बेजबाबदारपणे गाडी चालवली, त्यात अपघात होऊन दोघांचा जीव गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर, पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल आणि त्याचे वडिल सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर ड्रायव्हरला धमकावल्याप्रकरणी, व अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. आता न्यायालयाने दोन्ही बाप-लेकास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.