येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोनाच्या चाचणीचा अहवाल देण्यासाठी दौंड येथील शासकीय रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला १५०० रूपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने अटक केली आहे.
मिलिंद दामोदर कांबळे असे पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौड शासकीय रुग्णालयात कांबळे हे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत ते काम करतात. या रुग्णालयात करोनाची टेस्ट केली जाते. तक्रारदार व त्यांच्या १९ कामगारांनी शासकीय रुग्णालय दौड २६ फेब्रुवारी रोजी केस पेपर काढून कोविड १९ रॅपिड अँटीजेन टेस्ट केलेल्या आहेत. त्याचा अहवाल देण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी प्रत्येकी १०० रुपये असे एकूण एक हजार ९०० रुपये लाच तक्रारदार यांच्याकडे मागितली होती.