येस न्युज मराठी नेटवर्क : वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले ‘रिपब्लिक वृत्तवाहिनी’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाची आजची सुनावणी स्थगित करण्यात आलेली असून ९ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. सत्र न्यायाधीश आर जे मल्लशट्टी यांच्या कोर्टात सुनावणी पार पडली.
अलिबाग पोलिसांकडून जिल्हा सत्र न्यायालयात तिनही आरोपीची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र सुनावणी स्थगित झाली असून अर्णब गोस्वामींचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
दरम्यान दुसरीकडे अर्णब गोस्वामी यांच्या तातडीच्या अंतरिम जामिनावरील शुक्रवारची सुनावणी अपूर्ण राहिली असून शनिवारी पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयाने शनिवारी सुनावणी ठेवली असली तरी तातडीच्या अंतरिम जामिनाव्यतिरिक्त अन्य मुद्दय़ांबाबत याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. परंतु शनिवारीही सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही तर ती दिवाळीच्या सुट्टीनंतर घ्यावी लागेल. त्यामुळे सर्व मुद्दय़ांबाबत सुनावणी घ्यायची की केवळ तातडीच्या अंतरिम जामिनावर? अशी विचारणा न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने केली. त्यावेळी न्यायालयाला सोमवारपासून दिवाळीची सुट्टी असल्याने शनिवारी केवळ तातडीच्या अंतरिम जामिनावर सुनावणी घेण्याचे स्पष्ट करण्यात आले.