सोलापूर विद्यापीठात ‘इंडस्ट्री व इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन मीट’ संपन्न
सोलापूर, दि. 21- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमध्ये प्लेसमेंट सेल विभाग सुरू करावा. या विभागामार्फत विद्यार्थ्यांना रोजगारा संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन करण्याबरोबरच विविध उपक्रमांचे आयोजन करावे. त्याबरोबरच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना विविध कंपनी, उद्योग तसेच संस्थांमध्ये अप्रेंटशीप-प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करून त्यांना तशी संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी केले.
बुधवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभाग अंतर्गत असलेल्या बोर्ड ऑफ अप्रेंटशीप ट्रेनिंग, पश्चिम विभाग, मुंबई आणि विद्यापीठातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, अभ्यासमंडळे विभाग यांच्यामार्फत इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट इंट्रॅक्शन मीट पार पडले. यावेळी कुलगुरू प्रा. महानवर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रिसिजन कंपनीच्या संचालिका डॉ. सुहासिनी शहा, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, बोर्ड ऑफ अप्रेंटशीप ट्रेनिंग पश्चिम विभागाचे उपसंचालक एन. एन. वडोदे, स्मृती ऑरगॅनिकचे एचआर प्रमुख कमलाकर गज्जम, महाराष्ट्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसचे रोहन कुर्री आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यापीठातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. अनिल घनवट यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रोजगाराभिमूख कसे बनवता येईल, यावर अधिक भर द्यावा. वर्गात शिकवण्याबरोबरच इंडस्ट्रीविषयी प्रत्यक्ष ज्ञान देण्यासाठी प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे खूप गरजेचे आहे. यासाठी सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अप्रेंटशीपची गरज होती, ती आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मिळणार आहे. त्यासाठी महाविद्यालय व शिक्षकांनी इंडस्ट्रीच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांचा ग्रोथ वाढवावा, असे आवाहन देखील कुलगुरू प्रा. महानवर यांनी यावेळी केले.
डॉ. सुहासिनी शहा यांनी इंडस्ट्री भेटी वेळी विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देऊन त्याविषयी सखोल ज्ञान घेण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. . या कार्यक्रमास सोलापुरातील विविध इंडस्ट्रीचे एचआर प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती देवळे यांनी केले तर आभार सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी मानले.
अप्रेंटशीप करणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान 9 हजार विद्यावेतन
यावेळी बोलताना बोर्ड ऑफ अप्रेंटशीप ट्रेनिंग, पश्चिम विभागाचे उपसंचालक एन. एन. वडोदे म्हणाले, पूर्वी इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनाच अप्रेंटीशीप प्रशिक्षण मिळायचे. आता मात्र नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भारत सरकार द्वारा सर्व विद्यार्थ्यांना अप्रेंटशिपची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक चांगली संधी उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले. प्रशिक्षणादरम्यान अप्रेंटशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला विद्यावेतन सुद्धा दिला जातो. विद्यावेतनाचा किमान दर 9 हजार रुपये प्रति महिना इतका आहे. या विद्या वेतनातील 50 टक्के भाग भारत सरकारद्वारा आस्थापनांना दिला जातो. बरेचशे उद्योग 9 हजार पेक्षा जास्त विद्यावेतन विद्यार्थ्यांना देतात, असे वडोदे यांनी यावेळी सांगितले.
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट इंट्रॅक्शन मीट पार पडले. यावेळी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रिसिजन कंपनीच्या संचालिका डॉ. सुहासिनी शहा, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, बोर्ड ऑफ अप्रेंटशीप ट्रेनिंगचे उपसंचालक एन. एन. वडोदे, कमलाकर गज्जम, ऑफिसचे रोहन कुर्री व डॉ. अनिल घनवट.