तर महिला बालकल्याण जिल्हा कार्यक्रम अधिकारी पदी प्रसाद मिरकले यांची नियुक्ती
सोलापूर : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, माध्यमिक शिक्षण विभागाच्या उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे हे सोमवार ३ जुलै रोजी रूजू झाले आहेत. दुसरे उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे हे मंगळवार किंवा बुधवारी कर्तव्यावर हजर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सोलापूर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांची लातूर येथे प्रशासकीय बदली झाल्याने त्यांच्या जागी प्रसाद मिरकले यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रसाद मिरकले हे सोमवारी रूजू झाले आहेत. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकाऱ्यांची दोन पदे रिक्त आहेत. लातूर जिल्हा परिषदेत कार्यरत तृप्ती अंधारे यांची उपशिक्षणाधिकारी म्हणून सोलापूर येथे बदली करण्यात आली आहे. त्या सोमवारी हजर झाल्या आहेत.
सध्या पंढरपूर पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या महारुद्र नाळे यांना उपशिक्षणाधिकारी म्हणून बढती देण्यात आली आहे. पंढरपूर पंचायत समितीकडून त्यांच्या कार्यमुक्तीची प्रक्रिया सुरू असून, ते मंगळवार किंवा बुधवारी रूजू होण्याची शक्यता आहे.