मुंबई : राज्यातील नोकरशाहीमध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेत. सीताराम कुंटे यांना राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यालयानं ट्विटरवरून ही माहिती दिलीय. राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी 1985 च्या बॅचच्या सीताराम कुंटे आणि प्रवीण परदेशी यांची नावे चर्चेत होती. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सीताराम कुंटे यांच्या नावाला पसंती दिल्यानं ते आता राज्याचे मुख्य सचिव झालेत. सीताराम कुंटे येत्या 9 महिन्यांपर्यंत राज्याच्या मुख्य सचिवपदावर राहू शकतील, कारण नोव्हेंबर 2021 मध्ये तेही सेवानिवृत्त होणार आहेत.
प्रवीण परदेशी हे संयुक्त राष्ट्रामध्ये कार्यरत
सीताराम कुंटे सध्या गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहत आहेत, तर प्रवीण परदेशी हे संयुक्त राष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. राज्याचे विद्यमान मुख्य सचिव संजय कुमार 28 फेब्रुवारीला सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे. तर एमएमआरडीएचे प्रमुख आर. ए. राजीव यांनाही 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली.