येस न्युज मराठी नेटवर्क : मूळचे बार्शी तालुक्यातील महागावचे रहिवासी असलेले आय.ए.एस.अधिकारी रमेश घोलप यांची झारखंड राज्याच्या उद्योगसंचालनालयाच्या प्रमुखपदी डायरेक्टर इंडस्ट्रीज म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे झारखंड राज्यातील ग्रामीण कार्य विभागाच्या सहसचिव पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.त्याबाबत त्यांचे विभिन्न स्तरातून कौतुक होत आहे.
रमेश घोलप हे २०१२ बॅचचे आय.ए.एस अधिकारी असून ते सध्या झारखंड राज्यात कार्यरत आहेत. यापूर्वा त्यांनी धनबाद महानगर पालिका आयुक्त, सरायकेला, कोडरमा आणि गढवा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी , कृषी आयुक्त आणि एम.डी. NHM अशी विभिन्न पदे भूषवली आहेत. नुकतीच त्यांची गढवा जिल्ह्यातून बदली करण्यात आली होती.गढवा जिल्ह्यात कार्यरत असताना वर्षभरात त्यांनी बूढ़ा पहाड या नक्षलग्रस्त भागांमध्येकेलेल्या कार्याचे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांनी कौतुक केले होते.या बूढ़ा पहाड क्षेत्रातील दुरस्थ गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर पोहोचणारे ते पहिले जिल्हाधिकारी होते. घरघर सर्वे करून लोकांना योजनांमध्ये जोडण्याचे काम अत्यंत प्रभावीपणे त्यांनी केले होते. याशिवाय मुसहर जमातीतील लोकांना विविध योजनांशी जिल्ह्यातील सर्वे करून जोडण्याचे काम स्वातंत्र्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर केले होते. याशिवाय त्यांनी जिल्ह्यातील संस्थागत डिलीव्हरीसाठी स्वास्थ्य विभागामध्ये अत्यंत सख्त कारवाया आणि सरकारी हॉस्पीटल मध्ये व्यवस्थेत सुधारणा करून अत्यंत प्रभावापणे कार्य केले आहे.
त्यांच्या ‘प्रोजेक्ट स्वास्थ्य शुचिता’ चे विभिन्न स्तरातून कौतूक झाले होते. यामुळे सरकारी हॉस्पिटलमधील नि:शुल्क संस्थागत डिलीव्हरी मध्ये लक्षणीय प्रमाणात वाढ झाली होती. तसेच मातृ मृत्यू दर, शिशू मृत्यू दर यामध्येही विलक्षण घट झाली होती.
रमेश घोलप यांची नुकतीच झारखंड राज्याच्या उद्योग संचालनालयाचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. राज्यातील उद्योग व्यवसायांना चालना देणे आणि रोजगार निर्मितीसाठी कार्य करण्याची संधी यामाध्यमातून त्यांना मिळाली आहे. याशिवाय ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी कार्य करणाऱ्या ग्रामीण कार्य विभागाच्याही सहसचिवपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. या नवीन नियुक्तीबद्दल त्यांचे विभिन्न स्तरातून अभिनंदन होत आहे आणि लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत.