सोलापूर दि.04 (जिमाका) :- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर या बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणूक सन 2024-25 ते सन 2029-30 साठी दि.27 एप्रिल 2025 रोजी मतदान आणि दि. 28 एप्रिल 2025 रोजी मतमोजणी घेण्यात येऊन निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात झालेली असून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर या बाजार समितीचे कार्यक्षेत्र एकापेक्षा जास्त तालुका म्हणजे उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व सोलापूर शहर असे असल्याने सदरची बाजार समिती ही प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गटात मोडत असून सदर बाजार समितीच्या निवडणूकीमध्ये चुरस निर्माण झाल्याने उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व महानगर पालिका हद्दीतील 312 व्यक्तींनी वेगवेगळ्या मतदार संघातून नामनिर्देशन पत्र दाखल केलेली होती. निवडणूक पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून दि.04 मे 2025 पासून रेखांखीत चेकद्वारे निवडणूक डिपॉझीट रक्कम परत देणेबाबत कार्यवाही सुरू करण्यात आलेली असली तरी अद्याप 92 व्यक्तोंनी निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रासोबत भरणा केलेले निवडणूक डिपॉझीट कार्यालयातून स्वीकारलेले नाही.
निवडणूक डिपॉझीट रक्कम परत घेऊन जाण्याच्या अनुषंगाने यापूर्वीही दैनिक वर्तमान पत्रात बातमीद्वारे तसेच बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांद्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात आले होते.
तरी ज्या व्यक्तीनी अद्याप निवडणूक डिपॉझीट परत घेतलेले नाही त्यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर या कार्यालयातील निवडणूक शाखेकडे संपर्क साधुन ओळख पटवून आपला निवडणूक अनामत रकमेचा चेक प्राप्त करून घ्यावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी केले आहे.