येस न्युज नेटवर्क । देशात गेल्या एका दिवसात आणखी ५९ हजार ११८ जणांना करोनाची लागण झाली असून हा या वर्षीचा (एका दिवसात लागण होण्याचा) उच्चांक आहे. त्यामुळे देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या एका कोटी १८ लाख ४६ हजार ६५२ वर पोहोचली असल्याचे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.
त्याचप्रमाणे देशातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येने साडेतीन महिन्यांनंतर चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात सलग १६व्या दिवशी उपचाराधीन रुग्णांची संख्या चार लाख २१ हजार ०६६ इतकी झाली आहे. हे प्रमाण एकूण बाधितांच्या ३.५५ टक्के इतके आहे. करोनातून बरे होण्याचे प्रमाण ९५.०९ टक्के इतके झाले आहे.
देशात गेल्या २४ तासांत आणखी ५९ हजार ११८ जणांना करोनाची लागण झाली, १८ ऑक्टोबर २०२० नंतरचा हा उच्चांक आहे. करोनामुळे आणखी २५७ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या एक लाख ६० हजार ९४९ वर पोहोचली आहे. आतापर्यंत एक कोटी १२ लाख ६४ हजार ६३७ जण करोनातून बरे झाले आहेत, तर मृत्युदराचे प्रमाण १.३६ टक्के इतके आहे.