सोलापूर, दि.२३: अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून सामाजिक सुधारणेसाठी विविध कामे केली जातात. नगरपालिका, महानगरपालिकेच्या यंत्रणेने कामांचे प्रस्ताव वेळेत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या आढावा बैठकीत भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे, शहर अभियंता संदीप कारंजे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे, नगर रचनाचे सहायक संचालक एस.जे. देशपांडे यांच्यासह सर्व नगरपालिकेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
भरणे यांनी सांगितले की, प्रस्ताव सादर करताना लोकप्रतिनिधी, गटनेते यांच्याशी समन्वय साधून रेखा नकाशे, सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण सादर करा. प्रत्येक सदस्यांनी मागणी केलेल्या कामांसाठी समान निधी द्या. नगरपालिका क्षेत्रात ३३ कोटी ३९ लाख ३८ हजार रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. ही कामे दर्जेदार आणि वेळेत करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.