टोकियो : ऑलिम्पिकमध्ये भारताने सर्वात उत्तम कामगिरी केली असून एकूण सात पदकांची कमाई केली आहे. याआधी भारताने २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदकांवर आपले नाव कोरले होते . मात्र यावेळी भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदक जिंकत इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली. दरम्यान भारताची माजी खेळाडू अंजू बॉबी जॉर्जने मोदी सरकारच्या काळात नेमका काय बदल झाला सांगत कौतुक केले आहे.
ऑलिम्पिकच्या आधी मोदी सरकारने ज्याप्रकारे खेळाडूंना पाठिंबा दिला त्याचे अंजू बॉबी जॉर्जने कौतुक केले आहे. २००३च्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक पटकावून अन्य स्पर्धामध्येही यश संपादन करणाऱ्या माजी ऑलिम्पियन लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने आधीच्या सरकारमध्ये आणि आत्ताच्या सरकारमध्ये नेमका काय फरक आहे यावरही भाष्य केले . “आपले सरकार खेळाडूंना खूप प्राथमिकता देत आहे. पदक जिंकल्यानंतर थेट पंतप्रधान त्यांना फोन करत आहेत. कोणालाही ही संधी सोडायची नसावी,” असे तिने म्हटले आहे. यावेळी तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सहभागासंबंधीही सांगितले . “हे पहिल्यांदाच असं होत आहे. आमच्यावेळीही क्रीडामंत्री ऑलिम्पिक विलेजला भेट देत होते. वर्ल्ड चॅम्पिअनशिप जिंकल्यानंतर भारतात मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन झालं, पण मंत्रालयाकडून काहीही मोठी गोष्ट झाली नाही. हो…पंतप्रधानांनी (मनमोहन सिंग) माझे अभिनंदन केले . पण त्याशिवाय दुसरे काहीच नव्हते . पण यावेळी खेळाच्या आधीही पंतप्रधान (नरेंद्र मोदी) खेळाडूंना फोन करत आहेत, त्यांच्याशी संवाद साधत आहेत, त्यांना पाठबळ देत आहेत. भारतात काहीतरी मोठ होत आहे. मी ही मजा आणि संधी गमावत आहे,” अशी खंत अंजू बॉबी जॉर्जने व्यक्त केली आहे.“ते आमच्या पाठीशी असून पाठिंबा देत आहेत. प्रत्येक खेळाडूला त्यांनी दिलेल्या पाठिंब्याचाच हा निकाल आहे. खालच्या स्तरापर्यत काम केले जात आहे. दीर्घकाळासाठी योजना आहे. क्रीडा प्राधिकरण २०२८, २०३० च्या ऑलिम्पिकसाठीही तयारी करत आहे. अशाच प्रकारे सिस्टीम असली पाहिजे,” असे मत अंजू बॉबी जॉर्जने व्यक्त केले आहे. असाच पाठिंबा मिळत राहिला तर भारत पहिल्या क्रमांकावर असेल असा विश्वासही तिने व्यक्त केला आहे.