येस न्युज नेटवर्क : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने दिलेल्या न्यायालयीन कोठडीला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर देशमुख यांची पुन्हा एकदा 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केलाय. अनेल देशमुख एका प्रकरणात फसल्याचं दिसत आहे. त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये. त्यांनी गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले हे त्यांनी सांगावं. तेव्हा ते माफीचे साक्षीदार होऊ शकतात, असं आंबेडकर म्हणाले.
कलेक्शन झालं पण तो पैसा अनिल देशमुख यांच्याकडे नाही. मग तो पैसा कुठे गेला हे त्यांनी सांगावं. अनिल देशमुख यांचा बळी दिला जात आहे. राजा आणि वजिर मात्र पुढे येत नाहीत, असा दावा करतानाच राज्यपालांनी याचा विचार करावा, असं आवाहनही आंबेडकर यांनी केलंय. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नवाब मलिक यांनी जमीन घेतल्याचं माहिती होतं. तेव्हा कारवाई का केली नाही? आपल्यावर शेकल्यानंतर त्यांनी हे प्रकरण बाहेर काढलं. एक प्रकरण दाबण्यासाठी हे प्रकरण काढलं, असा आरोपही आंबेडकर यांनी केलाय.