तुर्की आणि सीरिया मधील विनाशकारी भूकंपांमध्ये सुमारे 30 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
तुर्की आणि सीरिया मधील विनाशकारी भूकंपांमध्ये सुमारे 29 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामध्ये अनेक नागरिक बचावल्याच्या घटना समोर येत आहेत. आता बचाव पथकाने सुमारे 128 तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन महिन्यांच्या बाळाला सुखरुप बाहेर काढलं आहे. या चिमुकल्यानं मृत्यूलाही चकवा दिला आहे.
भूकंपातील मृतांचा आकडा 29 हजारांच्या पुढे
तुर्की आणि सीरियामध्ये 6 फेब्रुवारी रोजी मोठा भूकंप झाला, यानंतरही अनेक भूकंपाचे धक्के बसले. भूकंपामुळे हजारो घरे आणि इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. ढिगाऱ्याखाली अडकून अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. अद्यापही ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकले आहेत. प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे. भूकंपामध्ये 85 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
भूकंपाच्या 128 तासांनंतरही बाळं सुखरूप
तुर्कस्तानमध्ये बचाव कार्यादरम्यान ‘जाको राखे सैयां मार सके ना कोई’ ही म्हणही खरी ठरत आहे. शेकडो टन वजनाच्या ढिगाऱ्याखालून लोक सुखरूप बचावल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. तुर्कीतील हाताय येथे शनिवारी ढिगाऱ्याखालून दोन महिन्यांच्या बाळाला सुखरुप बाहेर काढण्यात आलं. मृत्यूवर मात केलेल्या या चिमुकल्यासाठी जमावानं टाळ्या वाजवल्या. या चिमुकल्याला वाचवल्याचा आनंद मदत आणि बचाव पथकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. भूकंपानंतर सुमारे 128 तासांनी हे बाळ सुखरुप सापडलं आहे.