येस न्युज मराठी नेटवर्क : राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आम्हाला वेळ मागितला आहे. काही हरकत नाही. थोडा वेळ देऊ. 40 वर्ष दिले अजून थोडा वेळ देऊ. पण आरक्षणाचं आंदोलन थांबणार नाही. तुम्ही वेळ घ्या. पण आम्हाला आरक्षण द्या, मात्र आता दिलेला हा वेळ शेवटचाच असेल. आम्ही सरकारला 2 जानेवारीपर्यंतची वेळ देत आहोत, असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी तूर्तास उपोषण सोडत असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे अखेर नऊ दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटलं आहे.
निवृत्त न्यायमूर्ती एम. जे. गायकवाड आणि सुनील शुक्रे यांनी आज अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. याप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना कायदेशीर बाजू समजावून सांगितल्या. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न देता आपल्याला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. त्यासाठी मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठीचे निकष पार पाडले जात आहेत. त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. थोडा वेळ द्या. एक दोन दिवसात प्रश्न सुटत नाही. आपण मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार आहोत. त्यामुळे तुम्ही थोडा वेळ द्या, असं या दोन्ही निवृत्त न्यायाधीशांनी मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं.