मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे नी दिली आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना समर्थन दिलं आहे, तशा आशयाचे प्रतिज्ञापत्रक त्यांनी दिल्याची माहितीही तटकरेंनी दिली. ते आज माध्यमांशी बोलत होते.
पक्षांतर बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे, मोहम्मद फैजल आणि श्रीनिवास पाटील यांच्या विरोधात आम्ही पीटीशन दाखल केलं आहे. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आम्ही केलीय. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आम्हाला समर्थन दिलं आहे. त्यांनी अजित पवारांना पाठिंबा असल्याचं प्रतिज्ञापत्र दिलं आहे. त्यामुळं ते आमच्या सोबत आहेत असं आम्ही मानतो.